पुणे आणि जळगावात पावसाचे थैमान २२ ठार, आठ अजूनही बेपत्ता

September 27, 2019 8:34 PM | Skymet Weather Team

पुणे आणि जळगाव जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत २२ लोकांचा बळी गेला असून ८ अद्याप बेपत्ता आहेत. बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी भिंत कोसळणे, तर काही ठिकाणी वाहने व घरे वाहून जाण्याच्या घटना झाल्या आहेत.

पुण्यात गेल्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडला आहे. गुरुवारी २४ तासांच्या कालावधीत शहरात ५३ मिमी पावसाची नोंद झाली. १९ जुलै रोजीही पुण्यात अवघ्या ४५ मिनिटांत २८.८ मिलिमीटर पाऊस झाला होता.

गेल्या काही दिवसांत शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते व छोटे पूल पाण्याखाली गेले असून व नाले ओसंडून वाहत आहेत. मुंबई-बेंगळुरू महामार्गावर पुण्याला सातारा जोडणारा कात्रज बोगदा बुधवारीही बंद ठेवण्यात आला होता. ट्रान्सफॉर्मर्ससह अनेक झाडे व विजेचे खांब उखडल्याचीही बातमी समोर आली आहे.

दरम्यान, जळगावमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ५ जणांचा बळी गेला आहे. पुण्यासह आता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.

त्याचप्रमाणे, मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा आणि मराठवाड्यातील अनेक भागात पावसाळी गतिविधींमध्ये घट होईल. आता मात्र पावसाचा जोर कमी होऊन हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

याउलट विदर्भात मात्र आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

OTHER LATEST STORIES