Skymet weather

[Marathi] महाबळेश्वर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि नाशिक मध्ये विक्रमी पाऊस,सामान्य जनजीवन विस्कळीत

August 8, 2019 4:15 PM |

floods in Maharashtra

मध्य महाराष्ट्र हा हवामान विभाग पश्चिम घाटाच्या कुशीत विसावला असून कमी पावसाचे क्षेत्र आहे. कोल्हापूर, सातारा, आणि सांगली या दक्षिणेकडील भागांत पावसाचे प्रमाण कमी असून मासिक पावसाची सरासरी अनुक्रमे २०९ मिमी,१७२ मिमी आणि ८९ मिमी आहे.

सामान्यतः घाटाच्या जवळ वसलेल्या ठिकाणी इतर ठिकाणांच्या तुलनेत पर्जन्यमान कमी प्रमाणात होते. तथापि, या हंगामात  पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि महाबळेश्वर यांसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसला आहे. गेल्या काही दिवसांत या भागात विक्रमी पाऊस पडला आहे.

मध्य भारतापासून महाराष्ट्रापर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून ची लाट तीव्र झाल्याने मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतितीव्र स्वरूपाचा पाऊस झाला. तसेच पश्चिम किनारपट्टीवर ट्रफ रेषासुध्दा सक्रिय आहे. (कर्नाटकात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे मुख्य कारण)

शिवाय, ही सर्व ठिकाणे एकमेकांपासून काही अंतरावर पश्चिम घाटाजवळ वसलेली आहेत. या अंतरामुळे पाण्याच्या प्रवाह पूर्वेकडील दिशेने उतार असलेल्या भागांत वाहून जातो. नुकत्याच झालेल्या जोरदार संततधार पावसामुळे सर्व कालवे,तलाव आणि इतर जलसाठ्यांची पाणी साठवण्याची क्षमता संपली असल्याने ते भरून वाहत आहेत. खरं तर, पाणलोट क्षेत्रात झालेल्या धुवाधार पावसामुळे जलसाठ्यांची पाणी साठवण्याची क्षमता ओलांडली असल्याने बऱ्याच भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

तपशिलात जाण्यापूर्वी गेल्या २४ तासांतील बुधवार सकाळी ८:३० पासून मध्य महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकूयाः
Rainiest places in Madhya Maharashtra
 महाबळेश्वर

महाराष्ट्रातील या डोंगराळ भागात मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून सतत हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून २०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस हा शहरासाठी सामान्य झाला आहे. खरं तर, महाबळेश्वरने ने भारतातील सर्वाधिक पावसाचे शहर चेरापुंजीला मागे टाकले आहे. १ जून ते६ ऑगस्ट या कालावधीत महाबळेश्वरमध्ये तब्बल 5755 मिमी पावसाची नोंद झाली आहे.या ठिकाणी तीन अंकी पावसाच्या तब्बल १५ सारी कोसळल्या असून ३०० मिमी पेक्षा जास्त पावसाच्या तीन सरी नोंदल्या असून २०० मिमी पेक्षा जास्त पावसाच्या सात सरी बरसल्या आहेत तर १०० मिमी पेक्षा जास्त पावसाच्या पाच सरी नोंदल्या गेल्या आहेत. तथापि, महाबळेश्वरमध्ये चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची ही पहिली वेळ नाही. २०१८ मध्ये देखील महाबळेश्वरमध्ये अशीच परिस्थिती दिसून आली होती.

कोल्हापूर

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये अभूतपूर्व असा विक्रमी पाऊस कोसळत आहे. २००६ मध्ये झालेला ४२५. ५ मिमी पावसाचा विक्रम गेल्या पाच दिवसांत झालेल्या ५१९ मिमी पावसाने मोडला आहे. ५ आणि ६ ऑगस्ट रोजी येथे अनुक्रमे १०५ मिमी आणि १२८ मिमी इतक्या जोरदार पावसाची नोंद झाली.

मुसळधार पावसामुळे येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. २०० गावातील सुमारे ५१,००० लोकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जवळपास ३४० पूल पाण्याखाली गेल्याने समस्या गंभीर झाली आहे.

सांगली आणि सातारा

सातारा आणि सांगली येथे नुकताच सलग तीन दिवस १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासांत सातारा आणि सांगलीमध्ये अनुक्रमे २९. ३मिमी आणि २० मिमी पावसाची नोंद झाली. साताऱ्याचे मासिक सरासरी पर्जन्यमान १७२ मिमी असून गेल्या ८ दिवसात ४०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सांगलीमध्ये ८९ मिमी इतका सामान्य पाऊस नोंदला गेला आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे या दोन्ही शहरांतील जवळपास सर्व धरणे भरली आहेत.

नाशिक

या हंगामात नाशिकमध्ये देखील विक्रमी पाऊस नोंदला गेला आहे. जुलै महिन्यात शहरात ४९६. ३ मिमी पाऊस पडला जो सामान्य मासिक १५६. १ मिमी पेक्षा साधारणपणे तीन पट आहे. या आकडेवारीने शहरातील जुलै महिन्यातील दहा वर्षांचा विक्रम मोडला आहे. सलग तीन वर्षांपासून शहरात जुलै मध्ये विक्रमी पाऊस पडत आहे. ऑगस्ट महिन्यातही शहरात चांगला पाऊस पडत आहे. खरं
तर, संततधार पावसामुळे नाशिकचे प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर नुकतेच
पाण्याखाली गेले होते.

पुणे

पुणे शहरात बुधवारी संततधार पाऊस बरसत होता. परिणामी, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसाच्या आकडेवारीने शहरात नवा विक्रम प्रस्थपित केला आहे. स्कायमेटकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात सामान्य पावसाच्या १८७. २ मिमी च्या तुलनेत पुण्यात तब्बल ३६३. ४मि.मी. पाऊस पडला. शहराने जुलै महिन्यातील दहा वर्ष जुना विक्रम मोडला आहे. खरं तर, पुण्यातील ताम्हिणी घाटाने भारतातील सर्वात पावसाचे शहर चेरापुंजीला मागे टाकले आहे. १ जून ते ६ ऑगस्ट या कालावधीत ताम्हिणी घाटात तब्बल ५९३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अंदाज

आमच्या हवामानतज्ञांनुसार, पुढील काही दिवस महाबळेश्वर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे काही मुसळधार सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तथापि, पुणे आणि नाशिकमध्ये पावसाचे प्रमाण किंचित कमी राहील. दोन दिवसानंतर पावसाची तीव्रता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

परंतु या भागांतील सर्वच जलसाठे ओसंडून वाहत असल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास अजून काही कालावधी लागणार असून जनजीवन सामान्य होण्यास अजून थोडा वेळ लागेल.

Image Credits – India Today

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try